‘रात्रीस खेळ चाले’ निरोप घेणार

दिवाळीच्या मुहूर्तावर हंड्रेड डेज’ ही नवीन मालिका
नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम आणि अगदी महिन्याभरापूर्वी आलेला विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दिवसेंदिवस उत्कंठा वाढवणाऱ्या या नाईकांच्या वाडय़ात घडणाऱ्या घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण? याचे उत्तर सध्या मालिकेतील मंडळी आपापसातच शोधताना दिसत आहेत. त्यांना आणि प्रेक्षकांना हवे असलेले उत्तर दिवाळीपूर्वीच देऊन ‘झी मराठी’ वाहिनीवरील नाईक मंडळी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्याजागी आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित या जोडीची ‘हंड्रेड डेज’ ही रहस्यमय मालिका दाखल होणार आहे.

कोकणाच्या पाश्र्वभूमीवर चित्रित झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र आता दोनशे भागांच्या टप्प्यावर असताना या मालिकेने अनेक विक्रम नोंदवले आहेत. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत, याचे श्रेय मालिकेचे सहनिर्माते, लेखक संतोष अयाचित यांचे असल्याचे निर्माते सुनील भोसले यांनी सांगितले. मालिकेची कथा आणि त्यातील व्यक्तिरेखा इतक्या तपशीलवार लिहिलेल्या आहेत की, कलाकार नवीन असले तरी त्यांना ते काम करणे अवघड गेले नाही. शिवाय, कोकणातील वाडा आणि सलग पन्नास दिवसांचे चित्रीकरण यामुळेही एक वेगळे विश्व निर्माण करण्याची संधी कलाकारांना मिळाली, त्याचाही फायदा मालिकेला झाला असावा, असे संतोष अयाचित यांनी सांगितले. या मालिकेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मराठी मालिकेत ड्रोनने चित्रीकरण, सलग पन्नास दिवस चित्रीकरण असे अनेक विक्रम या मालिकेच्या नावावर आज जमा आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.
नाईकांच्या वाडय़ातील घडणाऱ्या घटनांचे रहस्य अजूनही प्रेक्षकांना उलगडलेले नाही, मात्र ते मालिकेतील कलाकारांनाही माहीत नसल्याचा धक्का संतोष अयाचित यांनी दिला. अशा प्रकारच्या मालिकांची मांडणी करताना त्यातले रहस्य काय हे कुठेही कळता कामा नये, यासाठी कलाकारांनाही त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षक जसे टीव्हीच्या पडद्यासमोर बसून एकमेकांवर संशय घेणाऱ्या नाईक मंडळींमधला खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढण्यात मग्न आहेत तसेच कलाकारही कॅमेऱ्यासमोर त्यांच्यातला गुन्हेगाराचा चेहरा कोणाचा? याचे उत्तर शोधताहेत. या दोघांनाही त्यांचे उत्तर दिवाळीपूर्वी मिळेल आणि मालिका निरोप घेईल, असे या निर्माताद्वयीने सांगितले.

आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे रात्री साडेदहाच्या या स्लॉटचा एक वेगळा जॉनर तयार झाला आहे. हा जॉनर कायम ठेवताना त्या जागी ‘हंड्रेड डेज’सारखी रहस्यमय मालिका वाहिनीने आणली आहे, अशी माहिती या मालिकेद्वारे टेलीविश्वात प्रवेश करणाऱ्या अभिनेता आदिनाथ कोठारे याने दिली. आदिनाथ या मालिकेत पहिल्यांदाच तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एक अत्यंत वेगळी अशी संकल्पना, विषय आणि मांडणी असलेल्या मालिकेतून टेलीव्हिजन पदार्पणाची संधी मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद झाल्याची भावना आदिनाथने व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post