मुसळधार पावसासह 'तौक्ते' चक्रीवादळ रत्नागिरीत जिल्ह्यात दाखल

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.

राजापूर तालुक्यामध्ये आज सकाळी पासून जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील काही घरांची किरकोळ पडझड व्यतिरिक्त कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनाऱ्यावरील आंबोलगड, माडबन, सागवे, अवळीची वाडी येथील काही घरांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते.

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर काल तहसीलदार प्रतिभा वराळे आणि गट विकास अधिकारी सागर पाटील यांनी किनाऱ्यावरील गावांमध्ये बैठका घेऊन लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. आपत्कालीन काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले होते. तर संभाव्य वादळाला सामोरे जाण्यासाठी नियोजन शिकेवले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थाही सतर्क झाले होते.

आज सकाळपासून जोरदार वारा आणि पाऊस सुरू होता. यामध्ये कशेळी, दांडे अनसुरे, दले, मिठगवाणे, सागवे परिसरातील घरावर झाड कोसळून घरांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. डोंगर titha येथे रस्त्यामध्ये झाड कोसळून वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने झाड तोडून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.

दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेऊन अवळीची वाडी येथील 35, आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 लोक, माडबन येथील 20 घरामधील 78 लोक, सागवे येथील 62 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. वादळाच्या अनुषंगाने तहसीलदार प्रतिभा वराळे या सातत्याने त्या भागातील प्रशासनासह लोकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देत होत्या.

वादळाचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यात जाणवत आहेत. किनारी भागातील गावांना याचा चांगलाच तडाखा बसला असून मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरीत मिऱ्या येथे वेगवान वारे वाहत आहेत. अजस्त्र लाटा किनाऱ्यावर फुटत आहेत. रत्नागिरीत वेगवान वारे वाहू लागलेत. समुद्राच्या लाटाही मोठ्या प्रमाणात उसळू लागल्यात. वेगाने वारे वाहू लागल्याने देवरुखमधील हरपुडे येथे झाड उन्मळून पडले. भलमोठे असणारे हे झाड बुधाजी घुग आणि पांडूरंग घुग यांच्या घरावर हे पडले आहे. यामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी घराचे नुकसान झाले आह. ग्रामस्थांकडून हे झाड बाजूला करण्याच काम सुरु आहे. साखरपा येथील कोंडगाव दळवीवाडी मध्ये सुरेश यशवंत सावंत यांच्या घरावर जुने आंब्याचे झाड पडले. यामुळे पडवी व किचन रूमचे नुकसान झाले. परंतु सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. तसेच कोंडगाव चावडी जवळ झाड पडून सीताराम मोरे यांच्या चिकन दुकानाचे नुकसान झाले.


Courtesy: ESakal

Post a Comment

Previous Post Next Post