कोकण रेल्वे कविता


लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण-गाडी आली
कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी 
ठाणे-मुंब्रा-कल्याणाची ओलांडुन खाडी
आली कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी.




जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेसन आले
ओढ लावी कर्नाळ्याची हिरवीहिरवी झाडी
आपट्यापासून गाठिल रोहे, तयार ठेवा नारळ-पोहे
स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी.

















कशासाठी पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी
आगीनगाडी नागीन जैसी जाते नागमोडी
दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेइल पाउसधारा
बघताबघता मागे टाकील सावंताची वाडी.









येथे डोंगर तेथे सागर, नारळ-पोफळ हिरवे आगर
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी
सरता कोकण पुढती जाते, गोव्यासंगे जुळवी नाते
कर्नाटक अन् केरळ-तामिळ प्रेमे यांना जोडी.


कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते द्वाही
सुखी होऊ दे गावित-कोळी कष्टाळू कुळवाडी
शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या अपुल्या आशा
कोकणच्या कैवारी नाथा, आशिर्वादा धाडी.

No comments