जिल्हय़ात 36 हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र


रत्नागिरी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी रत्नागिरी जिह्यातील 36 हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱयांना कर्जमाफीपोटी 141 कोटी रुपयांचा लाभ होईल, असा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले. यापूर्वी झालेल्या कर्जमुक्ती योजनेत रत्नागिरी जिह्यात 105 कोटी रुपये शेतकऱयांना वितरीत करण्यात आले होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 


राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसंदर्भात माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही आकडेवारी दिली. यावेळी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी, अग्रणी जिल्हा बँक प्रबंधक नंदकिशोर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्ज मुक्तीसाठी प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. त्यामध्ये 16 हजार 202 शेतकऱयांना 36 कोटी 41 लाख रुपयांची कर्जमुक्ती देणे शक्य होणार आहे. खासगी बँका राष्ट्रीयकृत बँका आदी बँकांनी वितरीत केलेल्या शेतीकर्ज प्रकरणांचा एकत्रित आढावा घेता या योजनेसाठी 36 हजार शेतकरी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱयांना एकूण 141 कोटी रुपये एवढी कर्जमाफी देणे शक्य होणार आहे.

7 जानेवारीपर्यंत कर्जमाफी विषयक शेतकऱयांच्या याद्या तयार करण्यात येतील. या याद्या अधिकृत संकेतस्थळावर दिसणार आहेत. ाढर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱयाला द्यायचा आहे. त्या शेतकऱयाचे कर्ज खाते आधारक्रमांकाशी जोडले गेले असले पाहिजे. ज्या शेतकऱयांचे खाते जोडले गेले नाही. त्यांनी ते लवकरात लवकर जोडून घ्यावे. या खाते जोडणीशिवाय कर्जमाफीचा लाभ देणे अशक्य असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

कर्जमाफीची ही रक्कम शेतकऱयाच्या थेट खात्यात जमा होईल. शेतकऱयाच्या खात्यात किती रक्कम जमा होणार याची माहिती शेतकऱयाला अगोदरच मिळणार आहे. त्याचा उताराही त्याला देण्यात येईल. कर्ज माफीमध्ये आधार क्रमांक व कर्ज आकडेवारी जुळत असल्याबद्दल शेतकऱयाने सहमती दर्शवावी. तसे न झाल्यास ते प्रकरण तक्रार म्हणून घेण्यात येईल. जिल्हा समिती अशा तक्रारीवर बारकाईने विचार करून पुढील निर्णय घेईल असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.

‘अजान’ च्या अगोदर आवाहन

मुस्लिम बांधव ध्वनीक्षेपकावरून अजान देत असतात. या अजानच्या पूर्वी शेतकऱयांनी आपले कर्ज खाते आधारला लिंक करावे म्हणून आवाहन करणारी क्लिप वाजवण्यात येईल. मंदिरांवरील भोंग्यांवरुनही असेच आवाहन करण्याविषयी सूचना देण्यात येतील. आधार जोडणी करून सर्व पात्र शेतकऱयांनी या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

Courtesy: Tarun Bharat

No comments